मी मराठी शाळा बोलतंय⁉️

144

शाळेची वास्तविकता…. लोकेश परसावार यांच्या लेखणीतून….

विपरीत परिस्थितीत जिथे आम्हाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता त्या परिस्थितीशी झगडत,संघर्ष करीत, हेटाळणी,अपमान दगडी मारा,शेणाचे गोळे फेकून विरोध झाला तरीही आजच्या काळातील खरी सरस्वती देवी सावित्रीबाई फुले आणि प्रत्येक पाऊलावर साथ देणाऱ्या ज्योतिबा फुले यांना त्या व्यवस्थेचा किती त्रास झाला तरीही त्यातून शेवटी मार्ग काढीत पहिली मुलींची शाळा काढीत आम्हाला शिक्षणाचं अधिकार दिला. त्या महामानवानी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी किती अडचणी बघितलं, नाहक त्रास सहन करावा लागला, अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, तरी त्या खचल्या नाही, डगमगल्या नाही आणि पहिली मुलींची शाळा सुरू केली. शिक्षणाची सुरुवात केली होती म्हणून आजही शिक्षण क्रांती झाली व प्रगती झाली. पण आज ज्या पद्धतीने मी माझ्या व इतर मराठी शाळेच्या अवस्था पाहतो तेंव्हा विद्येची देवी सावित्रीबाईंचा संघर्ष डोळ्यासमोर येतो. त्यांनाही वरून बघताना खंत वाटत असेल कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.

मी जि. प. प्राथमिक मराठी कन्या शाळा सिंदेवाही जि. चंद्रपूर माझा जन्म 1949 रोजी झाला.त्यावेळेस माझं भूमिपूजन करून पायाभरणी (बांधकाम) सुरू झाली एकावर एक विट ठेवून माझी उभारणी सुरू झाली. रोज अंगावर ( भिंतीवर) सकाळ, संध्याकाळ, माझी आंघोळ व्हायची रोज भिजत होती. कधी थंडीत, कधी पावसाळ्यात तर कधी उन्हाळ्यात बरं वाटत होतं. कारण इथे येणारी मुली ज्ञान शिकण्यासाठी काहीतरी घडण्यासाठी येणार होती.
रंगरंगोटी सुरू झाली मी वेगवेगळ्या रंगानी रंगत होती. माझी इमारत सुसज्ज झाली. आणि एक दिवस उजाडला माझं उद्घाटन सोहळा करण्यात आले तेही भव्य दिव्य कार्यक्रमात त्यात शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षिका, विद्यार्थीनी व गावकरी यांच्या समक्ष. उत्साह वाढला अनेक शिक्षक अनेक शिक्षिका, अनेक विद्यार्थीनी येऊन अखेर सुरू झाली ही शाळा. रोज सकाळी 10:00 वा. ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत किलबिलाट
म्हणजे सुरुवातीला घंटा मग प्रार्थना तेही शिस्तीत सुरू रहायचे आणि दिवसभर ज्ञान असा दिनक्रम नित्यनेमाने चालायचा, मात्र रविवारी मी सुन्न होऊन मी एकटक बघायची कारण सुट्टीचा दिवस असायचा.
कठीण होते ते फक्त उन्हाळ्याचे दिवसं त्यात एकटी पडून रहायची, ना शाळेची घंटा ऐकू यायची ना मुलींचा आवाज, मी प्राथमिक मराठी कन्या शाळा आजही ह्याच शाळेतून बरेच विद्यार्थीनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यवसायिक, सरकारी नोकर झाले असतील. माझ्या अंगणात बरेच धार्मिक कार्यक्रम झाले, कित्येक लग्न झाले, मंडप लागले, कित्येक मानाच्या पंक्ती बसल्या ज्यांचे लग्न झाले त्यातील काहीचे मुली ह्याच शाळेत शिकले.
बरेच दिवस मस्त चालत होतं, माझं वय वाढत होतं काळ बदलत होता हळूहळू खाजगी शाळा डोकं वर काढत होती. हळूहळू विद्यार्थीनी संख्या कमी होत होती. कधीकधी भीती वाटायची आणि हेच खरं झालं

कुणाची नजर लागली का कुणास ठाऊक हळूहळू मी जीर्ण होत होती माझे एक एक अवयव निकामी होत होते.डोक्यावरचे कवेलू फुटली, माझं लाकूड कुजलं, माझी दैनावस्था हळूहळू सुरू झाली पावसाळ्यात मी गळत होती. कधी काय पडेल खाली याची भीती वाटत होती आणि एक दिवस मी कोसळले.
आज मी मरणयातना भोगत आहे ? ना मुली ना शिक्षक, ना शिक्षिका इथे कुणीच नाही मी ओसाड झाली आहे दुर्लक्षित झाले. माझ्या हाकेच्या अंतरावर माझा भाऊ जि. प. प्राथमिक मराठी शाळा क्र 1 हा जीर्ण अवस्थेत आहे, तो व्हेंटिलेटरवर आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे म्हणजे त्याची डागडुजी ( बांधकाम) माझ्या शाळेतील मुली त्याच्या शाळेत शिकत आहे. तेही काही ध्येयवादी, प्रयत्नशील तरुणानी धडपड केली प्रयत्न केले. आज काहीतरी कामे सुरू झाली तो कसाबसा जिवंत आहे त्या सर्वांना सलाम, धन्यवाद आभार !
अगदी जवळच असलेला माझाच अजून एक भाऊ जि. प. प्राथमिक मराठी शाळा क्र 2 हेटी वॉर्ड सिंदेवाही तो पण जीर्ण अवस्थेत आहे, त्याची पण हीच अवस्था म्हणून दिवसेंदिवस तेथील मुलांची पटसंख्या कमी होत आहे.

पण शोकांतिका आहे की काय? याला जबाबदार कोण? प्रशासन, पालक, कि राजकारण ? हा प्रश्न अनभिज्ञ आहे.
असो एक निश्चित खाजगी शाळा वाईट नाही आम्ही पण वाईट नाही मग हा दुजाभाव का ? सरकार याला जबाबदार आहे का ? की सरकारची यंत्रणा जेवढा दोष प्रशासनाचा तेवढाच दोष पालकांचा बदललेला दृष्टीकोन.
आज एकाच शाळेत शिकलेले मित्र, मैत्रिणी, बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थीनी गेट टूगेदर करतात छान आहे जुन्या आठवणी ताज्या होतात बऱ्याच दिवसांनी मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटतात आणि गप्पा, चर्चा करतात पण एक गोष्ट त्या सर्वांना सांगावीशी वाटते की आपली मराठी शाळा पण वाचवा.
असो माझ्यासारखी अवस्था तुमच्या पण गावात असेल जे माझ्याबाबतीत घडलं तुमच्या गावात होऊ देऊ नका.
मराठी शाळा हळूहळू बंद होत आहे ही बिकट परिस्थिती आहे जागे व्हा आणि कार्याला लागा .
हीच आग्रहाची, कळकळीची विनंती.

माझें विद्यार्थी ! माझी शाळा !!
मराठी असल्याचे! गर्व पाळा !!

मराठी शाळा ! वाचली पाहिजे !!
मराठी शाळा ! टिकली पाहिजे !!

मराठी शाळा टिकवा !!!
मराठी भाषा जगवा !!!

जय महाराष्ट्र जय मराठी

आपली शाळा
जि. प. प्राथमिक मराठी कन्या शाळा सिंदेवाही ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर (म. रा.)

जन्म (स्थापना) 1949 मृत्यू (बंद)2016

🖋️🖋️ शब्दांकन🖋️🖋️
श्री लोकेश बाबुराव परसावार
सिंदेवाही जि. चंद्रपूर
9421724731