आंघोळीचा बेत ठरला जीवघेणा,  वर्धा नदीत पाच युवकांचा मृत्यू

407

आज दिनांक 9 जून ला  चंद्रपूर जिल्ह्यातील  घुग्घुसमध्ये  एक धक्कादायक घटना घडली आहे . पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला असून  या घटनेमुळे घुग्घुसमध्ये शोककळा पसरली आहे.  1. तन्मय नवनाथ पथाडे  2. रोहित बाबाराव बोबडे  3. सन्नी अशोक आसमपेल्ली  4. नकुल भास्कर केळझरकर  5. सम्यक देवराव सोनटक्के अशी  मृत युवकांची नावे आहेत .हे सर्व युवक इंदिरा नगर, वेकोली वसाहत, घुग्घुस येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही तरूण सोमवारीआंघोळीसाठी वर्धा नदीकाठी गेले होते. मात्र ते रात्री  पर्यंत घरी परत न आल्याने  कुटुंबीयांमध्ये   चिंता वाढली  .  दरम्यान,  काही प्रत्यक्षदर्शींनी संबंधित तरुणांना नदीच्या दिशेने जाताना पाहिल्याची माहिती दिली. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी नदी परिसरात धाव घेतली.त्यानुसार परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली असता वर्धा नदीच्या काठावर या पाचही तरुणांचे कपडे, शूज , चपला आणि मोबाईल आढळून आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

आज मंगळवारी सकाळी बचाव पथकाला तन्मय नवनाथ पथाडे याचा मृतदेह  नदीपात्रात तरंगताना आढळून आला.दरम्यान, इतर चार बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी नदीत मोठ्या प्रमाणावर पोलीस, बचाव पथके आणि स्थानिक नागरिकांकडून शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रोहित  बोबडे  ,सन्नी  आसमपेल्ली  , नकुल  केळझरकर  , सम्यक  सोनटक्के यांचेही   मृतदेह आढळून आले.
नदीतील पाण्याचा प्रवाह व खोलीमुळे शोधकार्यात अडचणी येत असतानाही पथकाने अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्यात आले .

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण घुग्घूस परिसरात हळहळ व्यक्‍त होत असून संबंधित कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  नागरिकांनी नदी, तलाव तसेच इतर जलाशयांजवळील धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.