आत्ताची ब्रेकिंग न्यूज….तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाच्या हल्ला;4 महिला ठार

10449

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही आणि परिसर आज एका अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटनेने हादरला आहे. जंगलात तेंदू पाने तोडण्यासाठी गेलेल्या कवडूबाई दादाजी मोहुर्ले-45,अनुबाई दादाजी मोहुर्ले-46,संगीता संतोष चौधरी-36,सुनीता कौशिक मोहुर्ले-33 या महिलांवर वाघाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हिंस्त्र हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नेहमीप्रमाणे या महिला जंगलात पाने तोडण्याच्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. जंगलाचा आसरा आणि हिंस्त्र प्राण्याचा वेग यामुळे महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि वाघाने चौघींनाही जागीच ठार केले.घटनास्थळी वनविभाग व पोलीस विभागाची चमू पोहचली आहे.

वाघाचा बंदोबस्त करा-पुणेश गांडलेवार

या परिसरात बऱ्याच दिवसापासून वाघाचा वावर आहे त्यामुळे या वाघांनी तर मानव जातीवर हल्ला करण्यास सुरुवात केली असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी गुंजेवाही येथील युवा नेते पुणेश गांडलेवार यांनी केली आहे.