लग्नानंतर १२व्या दिवशीच तलाठी पतीची आत्महत्या; पत्नीचे प्रेमसंबंध उघड झाल्याने उचलले टोकाचे पाऊल
डायरीतील लिखाणामुळे गुपिताचा पर्दाफाश : पत्नीविरोधात गुन्हा दाखल
बीड/अंबाजोगाई : लग्न होऊन नवीन संसाराची सुंदर स्वप्ने पाहत असतानाच, विवाहानंतर अवघ्या १२व्या दिवशीच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या एका २६ वर्षीय तलाठी पतीने अंबाजोगाई येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. पत्नीचे दुसऱ्या एका मुलासोबत असलेले प्रेमसंबंध आणि तिने पतीला स्वीकारण्यास दिलेला नकार, या मानसिक धक्क्यातूनच पतीने आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या जबाबावरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा (ता. औसा) येथील अंगणवाडी सेविका सुनंदा दत्तू कोळी यांचा मुलगा गणेश दत्तू कोळी हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १४ संभाजीनगर येथे पोलिस शिपाई म्हणून भरती झाला होता. नोकरीत असतानाच गणेशने चंद्रपूर येथे तलाठी पदाची परीक्षा दिली आणि २०२४ मध्ये तो तलाठी म्हणून नोकरीस लागला. त्याचा विवाह १३ मे २०२६ रोजी दीपाली कोळी हिच्यासोबत बीड येथील रविराज मंगल कार्यालयात पार पडला होता. दीपाली ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये नोकरीला आहे. ४ जून राेजी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात दीपालीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
देवदर्शनाहून परततानाच संशयाची ठिणगी
लग्नानंतर दोघेही कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतताना दीपालीला कोणाचा तरी फोन आला, ज्याबाबत विचारणा केली असता, तिने बोलण्यास नकार दिला. १८ मे रोजी घरी सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र त्यानंतर गणेश कमालीचा नाराज राहू लागला. त्यानंतर दीपाली नातेवाइकांसोबत माहेरी बीडला निघून गेली.
“माझ्या मनाच्या विरुद्ध लग्न लावून दिले…”
दोन दिवसांनी सासरी येण्यासाठी फोन केला असता, दीपालीने सासूला स्पष्ट सांगितले की, “माझे लग्न माझ्या मनाच्या विरुद्ध लावून दिले आहे, मला गणेशसोबत राहायचे नाही”. ती घरात असतानाही सतत फोन लॉक करून कोणाशीतरी बोलायची. दरम्यान, दीपालीने गणेशला सतत फोन करून अंबाजोगाईला बोलावून घेतले. २४ मे २०२६ रोजी गणेश तिला भेटण्यासाठी अंबाजोगाई येथील मोरेवाडी भागात ती राहत असलेल्या खोलीवर गेला.
डायरीतील लिखाणामुळे गुपिताचा पर्दाफाश
२५ मे २०२६ रोजी सकाळी गणेशने त्याच्या बहिणीच्या मोबाइलवर फोन करून आपली व्यथा मांडली. तो म्हणाला, “दीपालीसोबत लग्न करून माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे. तिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. तिने तिच्या डायरीमध्ये तसे लिहून ठेवले आहे, जे मी स्वतः वाचले. मी विचारणा केली असता, तिने माझ्यासोबत जोरदार भांडण केले”. या संभाषणानंतर गणेशचा फोन बंद झाला. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गणेशने दीपाली राहत असलेल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.








