चंद्रपूर मध्यवर्ती बँके कडून पहिल्या टप्यात 3 कोटी 6 लाखाचे कर्ज वाटप ;संचालक रोहित बोम्मावार यांचे हस्ते चेक वितरण;

181

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा-सावलीच्या वतीने रोहित बोम्मावारांच्या उपस्थित पीक कर्ज वाटप

सावली (तालुका प्रतिनिधी) खरीप हंगामासाठी शासनाने पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान केली असून नियमितपणे कर्ज फेड केलेल्या शेतकरी सभासदांना कर्ज वाटप केलेआहे.कर्ज वितरण पारदर्शक करण्यासाठी थेट रक्कम शेतकऱ्यांच्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यात जमा केली आहे.ही प्रक्रिया रोहित बोम्मावार संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या उपस्थितीत पार पडली.शाखा सावलीतर्फे सन २०२६-२७ या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळावे आणि शेतीकामासाठी आवश्यक भांडवलाची अडचण भासू नये, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात सावली विविध कार्यकारी सहकारी संस्था (रजिस्टर क्र. ४९३) अंतर्गत एकूण ३५९ सभासदांना ३ कोटी ६ लाख,१९हजार५००शे रुपये इतक्या मोठ्या रकमेचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. बँकेच्या माध्यमातून वेळेवर कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते, औषधे तसेच शेतीची इतर कामे सुरळीतपणे पार पाडण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित बोम्मावार प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या सोबत सावली विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल स्वामी, शाखाधिकारी एन. डी. घोनमोडे, निरीक्षक पाडेवार, उमेश वाकडे, खोमदेव तुम्मेवार, परशुराम मेटकर, खुशाल अंबाडे, गणपत सोपंकार तसेच संस्थेचे व्यवस्थापक प्रवीण इयापूरवर, विजय सातरे, आकाश पाल व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शेतकरी बांधवांनी बँकेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत बँकेचे आभार मानले.

यावेळी मार्गदर्शन करताना रोहितभाऊ बोम्मावार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे ही बँकेची प्राथमिकता असून, कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास संबंधित शाखाधिकारी अथवा थेट माझ्याशी संपर्क साधावा. बँक शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचे समाधान करण्यासाठी तत्पर आहे.” असे आवाहन त्यांनी केले.

तसेच शेतकऱ्यांनी कर्जाचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून शेती उत्पादन वाढवावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि वेळेवर कर्जाची परतफेड करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सुचविले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखाधिकारी, कर्मचारी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्यामुळे शेतकरी व बँक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी देण्याचा बँकेचा प्रयत्न राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.