रोहित बोम्मावार यांच्या नेतृत्वात खेडी मायनरची पाहणी; अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवत तात्काळ दुरुस्तीची मागणी

242

आसोलामेंढा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खेडी मायनरची दुरवस्था झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित बोम्मावार यांच्या नेतृत्वात खेडी मायनरची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

 

यावेळी उपविभागीय अभियंता श्री. हरिराम येनस्कर यांना प्रत्यक्ष स्थळी बोलावून मायनरची वस्तुस्थिती दाखविण्यात आली. अनेक ठिकाणी कालव्याची दुरवस्था झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रभावित होत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच मायनरची तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांना नियमित व सुरळीत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

 

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात खेडी मायनरची रखडलेली दुरुस्ती त्वरित पूर्ण करावी, अन्यथा आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल, असे नमूद करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी खेडीचे सरपंच सचिन काटपल्लीवार, सोमेश्वर कंचावर, परशुराम मारलवार, अनिल माचेवार, संदेश काटपल्लीवार, कृष्णा कटकमवार, प्रितम बद्दामवार, संकेत बद्दामवार, प्रसन्न काटपल्लीवार, साजन काटपल्लीवार, प्रफुल मोहुर्ले, यश काटपल्लीवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी शेतापर्यंत पोहोचलेच पाहिजे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन खेडी मायनरची दुरुस्ती पूर्ण करावी,” अशी भूमिका मा. रोहितभाऊ बोम्मावार यांनी यावेळी मांडली.

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया:

“नेहमी केवळ आश्वासने मिळतात, पण रोहितभाऊंनी थेट अधिकाऱ्यांनाच बांधावर आणल्यामुळे आता आमचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे.”लोकप्रतिनिधी किंवा बँकेचे संचालक जेव्हा अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नासाठी स्वतः मैदानात उतरतात, तेव्हा प्रशासनालाही गतीने काम करावेच लागते. रोहितभाऊ बोम्मावार यांच्या या तत्परतेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.