रस्ता सुरक्षेसाठी गोंडपिपरी पोलिस मैदानात
एस न्यूज नेटवर्क /बाळू निमगडे/आक्सापूर-
लोहखनिज वाहतुकीमुळे रस्त्यावरील सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला.दरम्यान गोंडपिपरी पोलिसांना याबाबत अवगत करून दिल्यानंतर जनभावनेची दखल घेत मोठ्या प्रमाणात मार्गाच्या दुतर्फा लावून असलेल्या गाड्यावर ठाणेदारांनी कारवाईचा बडगा उगारला.एन रस्त्यावर नो पार्किंग झोन मधील या प्रकारामुळे नागरिकांना त्रास होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.यापरिस्थितीत हातावर हात धरून बसण्यापेक्षा पोलिसांनी रस्त्यावरील वाहनचालकांवर कालपासून कार्यवाहीचा सपाटा सुरू केला.रात्रंदिवस चालणाऱ्या या दमदार कार्यवाहीत त्यांनी लहानमोठ्या सर्वांनाच हटकुन काढले.मार्गावर रस्त्याच्या कडेला अनाधिकृत गाड्या लावणाऱ्या अनेक वाहनचालकांवर पोलिसांनी कायद्याची चाबूक हाणली.या प्रकारातून विभाग ‘अँक्शन’ मोडवर आला असताना दारु पिऊन गाडी चालविणाऱ्याविरुद्ध देखील त्यांनी जोरदार मोहीम उघडून मद्यपिंना त्यांची जागा दाखवून दिली.

गोंडपिपरी पोलिसांनी रस्त्यावर गाड्या थांबवून अतिक्रमण करणाऱ्यांवर चांगलाच शिकंजा कसला आहे.मोहिमेदरम्यान अनेक वाहनचालक त्यांच्या हाती लागत आहेत.यावेळी पोलिसांकडून त्यांना किंवा सोबतच्या व्यक्तीचे समुपदेशन केल्या जात आहे.असे होतांना कार्यवाहीचा बडगा मात्र चालकावर उगारला जात असून या पद्धतीने सुरू असलेल्या कारभारादरम्यान गोंडपिपरी पोलिसांनी काल एकाच दिवसात तब्बल ४० वाहनावर कारवाई करीत संबंधितांकडून २० हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.यासह ड्रिंक्स अँड ड्राईव्ह अंतर्गत त्यांची दणकेबाज कामगिरी सुरू आहे.नुकतेच १७ मद्यपिंवर पोलिसांनी शिकंजा कसला असून त्यांच्याकडून १ लाख ७० हजाराचा महसूल जमा होणार आहे.सद्यस्थितीत नो पार्किंग झोनमध्ये गाडया उभ्या ठेवणाऱ्या वाहनधारकाच्या पायाखालची वाळू सरकतांना दिसत आहे.अत्यंत्य कटाक्षाने या दोन्ही मोहीम फत्ते करण्यासाठी गोंडपिपरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे,हेड कॉन्स्टेबल (वाहतूक) मनोहर मत्ते,जीवन आचेवार,गणेश पोदाळी कर्तव्यावर आहेत.त्यांची वाहतूक व्यवस्थेवर करडी नजर आहे.दरम्यान अहेरी-चंद्रपूर मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढली असताना जिल्हा पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,उपविभागीय पोलिस अधिकारी शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.दररोज शहराच्या मुख्य पाईंडवर पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राइव्हची प्रामुख्याने तपासणी होत आहे.यामाध्यमातून मद्यपी चालकांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.यापूर्वी सुध्दा येथील वाहतूक पोलिसांची ड्रिंक अँड ड्राईव्हसंदर्भात कामगिरी उल्लेखनीय राहिली.त्यांनी आपल्या कामातून जिल्ह्यात सर्वाधिक महसूल मिळवून दिला होता.सद्यस्थितीत ठाणेदार रमेश हत्तिगोटे यांचे शिस्तबध्द नियोजन आणि कामाच्या काटेकोर अंमलबजावणीतून कारवायांचा सपाटा सुरू असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील घट होत आहे.त्याचवेळी मद्यपी वाहनचालकांवर सुध्दा लगाम बसू लागल्याने लोकांनी सावधानता बाळगली आहे.








