चंद्रपूर, दि. 27 मे – सदैव हसतमुख, दिलखुलास व्यक्तीमत्व, सर्वांच्या मदतीला धावून जाणारा, गावातील जनतेला आपला वाटणाऱ्या एका तलाठ्याने हाताची मेहंदी निघण्यापूर्वीच लग्नाच्या 12 व्या दिवशी पत्नीच्या फ्लॅटवर गळ्फास घेउन आत्महत्या केली. ही घटना दि.25 मे रोजी आंबेजोगाई, जि.बीड येथे घडली. या घटनेने कोळी कुटुंबीय तर प्रचंड हादरले. सोबतच जिथे नोकरीत कार्यरत होता, त्या मुल तहसील कार्यालयातील मित्रपरिवारही हळहळत आहेत.
श्री.गणेश दत्तू कोळी (28) रा.नांदुरा, ता.औसा, जि. लातूर असे मृतकाचे नाव आहे. मुल तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बोरचांदली साझाचे ते ग्राम महसूल अधिकारी होते. या नोकरीपूर्वी एसआरपीएफच्या दगदगीच्या नोकरीतही वेळ काढून त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि ते तलाठी बनले.
*असे काय घडले असावे*
लग्न 13 मे रोजी असल्याने गणेश कोळी हे 8 मे रोजी गावाकडे जाताना कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून लग्नाला नक्की या, असे आग्रहाने सांगून गेले. काही सहकारी लग्नालाही गेले. लग्नात अत्यंत आनंदित असताना या 12 दिवसात नेमके असे काय घडले की, त्याने इतकी टोकाची भूमिका घेतली. यामागील कारणांचा शोध घेण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे.
*कुटुबांचा आधारवड हिरावला*
गणेशच्या कुटुंबात तोच कमावता मुलगा होता. वडिल आजारी, मागीलवर्षी लग्न झालेली बहिण प्रसुतीसाठी घरी आलेली आताच लग्नकार्य आटोपले असताना गणेशने आत्महत्या केल्याने कोळी कुटुंबाचा आधारवड हिरावला गेला आहे .ज्या वयात मुलाच्या खांद्यावर जायचे होते, त्याच खांद्यावर मुलाचे पार्थिव नेण्याची दुर्दैवी वेळ वडिलांवर आली.
*संशयास्पद आत्महत्येची चौकशी करा*
गणेश हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. परंतू त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याने त्याचा मित्र परिवार हळहळत आहे. त्याच्या संशयास्पद आत्महत्येची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या मित्रपरिवाराने केली आहे.*तपासात दिरंगाईचा संशय*
लग्नाच्या 12 व्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याने आत्महत्या करणे, ही गंभीर घटना असतानाही पोलीस मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद करून वेळ मारून नेत आहेत. या घटनेची सखोल चौकशी होऊ नये, असा दबाव तर पोलिसांवर नाही ना? अशी शंका त्याच्या मित्र परिवाराने उपस्थित केली आहे. तपासात दिरंगाई करणाऱ्या व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव आणणाऱ्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणीही मित्रपरिवाराने केली आहे.
प्रिय गणेश तू चुकलास*
गणेश तुझी ओळख झाली तेव्हापासून तू सर्वांना आपला वाटू लागला होता. परंतु तू, कुणालाही आपला समजला नाहीस, याचे शल्य जन्मभर राहील. तु, मित्रांना तरी आपला समजला असतास तर असा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी बोलला असतास. त्यातून निश्चितच मार्ग निघाला असता. परंतु तुला ना घरचे वाटले, ना मित्र जवळचे वाटले. म्हणून तुने असा आत्मघातकी निर्णय घेतलास. जे केलेस, ते फार चुकीचे केलेस. तुला क्षमा नाही.
पतीच्या अंत्यसंस्कारातही अनुपस्थित
13 मे रोजी लग्न होणे. 18 मे रोजी ती माहेरी जाणे. आणि 25 मे रोजी पतीने आत्महत्या केल्यानंतर सोपस्कार करून तिचे न दिसणे, 26 मे रोजी अंत्यसंस्कारालाही उपस्थित न राहणे,
हा संपूर्ण घटनाक्रम अनेक शंकांकुशंकांना बळ देणारा ठरत आहे.
—-—————————








