हरंबा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका नसल्याने नागरिकांचे बेहाल

257

सर्व हरांबा गावकऱ्यांची यांची आरोग्य सेविका उपलब्ध करून देण्याची मागणी

हरंबा(मोहीत मुद्दमवार) चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरंबा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मागील चार महिन्यांपासून आरोग्य सेविका उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उपकेंद्रात आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याने महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत.

गर्भवती महिलांची तपासणी, लसीकरण, प्राथमिक उपचार तसेच नियमित आरोग्य सेवा बंद पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. हरंबा परिसरासाठी लोंढोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी त्या ठिकाणीही डॉक्टर विहित वेळेत उपलब्ध राहत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते पप्पू चापले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ आरोग्य सेविका उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. “ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

हरंबा येथील ग्रामस्थांनी संबंधित आरोग्य विभागाने त्वरित दखल घेऊन रिक्त पद भरावे तसेच लोंढोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नियमित उपलब्ध राहतील याची खात्री करावी, अशी मागणी केली आहे।