
सावली तालुक्यातील मोखाडा येथे एका भीषण अपघातात
दुमाजी आनंदराव साहारे वय ३१ वर्षे या कर्त्या युवकाचा मृत्यू झाला, मात्र या घटनेला काही दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला अद्याप त्या काळ बनून आलेल्या वाहनाचा शोध घेता आलेला नाही. या प्रकरणाला आता अवैध दारू तस्करीचे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या कुटुंबाने थेट पोलीस अधीक्षकांचे दार ठोठावले आहे.
सावली तालुक्यातील मौजा मोखाडा येथील रहिवासी दुमाजी आनंदराव साहारे वय ३१ वर्षे हे ६ मार्च २०२६ च्या रात्रौला राष्ट्रीय महामार्ग वरील दुसऱ्या कडेला जात असतांनाच एका भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना चिरडले.
अपघात इतका भीषण होता की दुमाजी साहारे गंभीर जखमी झाले.घटनास्थळी पोलिसांनी प्रथम रुग्णालयात भरती केले त्यानंतर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मृत्यूशी झुंज देत असताना ८ मार्च रोजी दुमाजीची प्राणज्योत मालवली.आणि कुटुंबियाणी टाहो फोडला.अतिशय चांगला असलेला दुमाजी याला वडील नाही फक्त आई आहे.आणि त्यात याचाही मृत्यू झाल्याने आई पोरकी झाली मात्र माझ्या मुलाचा अपघात घडविण्याऱ्या गाडीचा शोध घ्या व आरोपी ला ताब्यात घ्या अशी आर्त मागणी करीत आहे. या अपघाताला दोन आठवडे झाले मात्र गाडी व आरोपी गवसले नाही.

स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार, सदर वाहन हे मुल-सावली-व्याहाड ते गडचिरोलीत अवैध दारू पुरवठा करणाऱ्या माफियांचे असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आपल्या कुटुंबाचा आधार गमावलेल्या साहारे कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले. कुटुंबाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन निष्पक्ष तपास करण्याची आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जर स्थानिक पोलीस स्टेशन सावली तपासात कुचराई करत असतील, तर विशेष तपास पथक नेमून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी आर्त हाक या कुटुंबाने दिली आहे.








