जिवती वनपरिक्षेत्रात नैसर्गिक बीज रोपण करीत जागतिक पर्यावरण दिन

145

 

जिवती(प्रतिनिधी)-

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला जात असून, यंदाही जिवती वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र वणी, जिवती, शेणगाव, पाटण व भारी उपक्षेत्रात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिवती शिवारात अतिक्रमण केलेल्या जमिनीवर रोपवन करण्यासाठी कडुलिंब, सिताफळ, आंबा, चिंच, बेल, अमरतास, मोहा, बिब्बा, अशा विविध जातींच्या बियांचे टोबण करण्यात आले.

पर्यावरणाचे संतुलन व संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकांनी स्विकारून निसर्ग व प्राणी जतन करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस मानव जातीकडून नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास केला जात असून जंगली प्राण्यांवर निर्दयीपणा दाखविला जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. मानवाला त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत

आहे. त्यामुळे नैसर्गिक संपत्ती व प्राण्यांचे संरक्षण करणे काळाची गरज असल्याचे मत जिवतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे यांनी व्यक्त करून जनजागृती केली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे, वनक्षेत्र सहायक के.बी. करकाडे, वनरक्षक एस.डब्लु. आलाम, एल. जी. निकुरे, विनायक पवार तसेच वनमजुरांसह ,वन्यप्रेमी,गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.