शंभर गोवंशाची तस्करांच्या तावडीतून सुटका
एस न्यूज नेटवर्क /बाळू निमगडे/आक्सापूर-
पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती गोंडपिपरी पोलिसांना मिळाली.दरम्यान पोलिसांनी भंगाराम तळोदी येथे नाकाबंदी करून ट्रक क्र.एमएच ३२ बी ९५८४,एमएच ३४ बीजी ८८२४ व एमएच ४० बीएल ७१८६ यांना थांबवून गाड्यांची तपासणी केली असता सदर तिन्ही ट्रकमध्ये गाय,बैल व गोरे असे १०८ गोवंशीय जनावरे आढळून आली.त्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी संपूर्ण जनावरांची रवानगी करण्यात आली.सदर कार्यवाहीमुळे गोवंश तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

साधारणतः १२ लाख ४५ हजार रुपयांचे गोवंश आणि ३ ट्रक असे एकुण ४२ लाख ४५ हजार रूपयाचा मुद्देमाल पोलिस कार्यवाहीदरम्यान मिळून आला.त्यापैकी शंभर जनावरे लोहारा येथील गोशाळेत दाखल केली असून यातील ८ जनावरे मरण पावली आहेत.दरम्यान गोंडपिपरी पोलीस स्टेशनला या घटनेसंदर्भात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.यावेळी गुलाम अली मुसाबअली खान (वय ४७) रा.गडचांदुर याला अटक करण्यात आली आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू,उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत याच्या मार्गदर्शनाखाली सपोनी रमेश हत्तीगोटे,स.फौ.वसंत कोसनशिले, पो.हवा.गणेश पोदाडी,मनोहर मत्ते, प्रशांत नैताम,सचिन मोहूर्ले यांनी केली आहे.








