चोरबिटीवर नियंत्रणासाठी गोंडपिपरी कृषी विभागाची जोरदार ‘फिल्डीग’

296

 

सचिन पानसरेंच्या नेतृत्वात सीमेवर मोर्चेबांधणी

एस न्यूज नेटवर्क / बाळू निमगडे/आक्सापूर-

गोंडपिपरी लगतचा पोंभूर्णा तालुका यावेळी चोरबिटीचा ‘हब’ म्हणून ओळखला जात आहे.दरम्यान दरवर्षीच शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात चोरबिटीची तस्करी होत असल्याचे प्रकार समोर आले.दुप्पट,तिप्पट भावाने परप्रांतातून ही बिटी विकण्याचा गोरखधंदा गोंडपिपरी तालुक्यात चालत असताना अशा प्रकाराचा बीमोड करण्यासाठी येथील तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांनी प्रभावी उपाययोजना केली आहे.गावागावात विभागाने आपली यंत्रणा ‘ॲक्टिव्ह’ करून त्यांनी जनजागृतीवर भर दिला आहे.कृषी विभागाची ‘टीम’ गावात दाखल होऊन चोरबीटीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू लागले असताना त्याचा सकारात्मक परिणाम तालुक्यात दिसू लागला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पन्न घेतल्या जाते.कमी कचरा व जास्त पीक या भावनेने येथील शेतकरी चोरबीटी बियाणांना पसंती देतात.लगतच्या तेलंगणा राज्यात सहज उपलब्ध होणाऱ्या या बियाणांना महाराष्ट्रात बंदी आहे.अशावेळी परप्रांतातून चोरबीटीची तस्करी करून ती तिप्पट किमतीने विकल्या जाते.गेल्या काही वर्षांत तस्करांमध्ये बरीच वाढ झाली.जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुका तर चोरबीटीचा ‘हब’ बनला आहे.अशावेळी लगतचा गोंडपिपरी तालुका ‘अलर्ट’ आहे.राज्य सीमेवरील हा तालुका चोरबिटी तस्करांच्या केंद्रस्थानी आला असताना वर्धा नदीकाठावर कृषी विभागाचे पथक डोळ्यात अंजन घालून फिरत आहे.सीमावर्ती गावात कर्मचाऱ्यांचा दौरा वाढला आहे.दरम्यान आपल्या गुप्तहेरांना तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांनी ‘अक्टिव्ह’ करून कामी लावले आहे.दरम्यान प्रशासनाने या दोन्ही तालुक्यात मोठ्या कारवाया करीत तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.कृषी अधिकारी पानसरे यांनी तालुक्यात विविध अभिनव उपक्रम राबविले.सध्या शेतीहंगाम सुरू आहे.बळीराजा मशागतीच्या कामाला लागला.अशावेळी चोरबीटी तस्कर सुध्दा सक्रिय आहेत.याचा बंदोबस्त करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांनी गावागावांत शेतकरी बांधवाना जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.चोरबीटी बियाण्यामुळे शेतीला होणाऱ्या मोठ्या नुकसानाची माहिती दिली जात आहे.सोबतच जर कुणी चोरबीटी विक्री करीत असेल,तर त्याची माहिती देण्याकरिता गावात यंत्रणा ‘अलर्ट’ करण्यात आली आहे.पानसरे यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी महेंद्र डाखरे हेदेखील ‘अॅक्टिव्ह’ मोडवर आहेत.

“तेलंगणा सीमेवर चोरबिटी विक्रेत्यावर कारवाईसाठी कृषी विभागाने बांधणी केली आहे.मागील वर्षी या बिटीचा चांगला अनुभव शेतकऱ्यांना आला.त्यामुळे यंदा अशा बोगस बीटी पासुन सावधान राहावे”

सचिन पानसरे
तालुका कृषी अधिकारी,गोंडपिपरी