विहिरी बांधून शिवार फुलविणाऱ्या गावाने मिटविला जमिनीच्या मालकी हक्काचा प्रश्न

287

 

* पिढ्यानपिढ्यापासून रहिवासी नागरिकांना मिळाली शासनाची सनद

एस न्यूज नेटवर्क / बाळू निमगडे/आक्सापूर-

स्वामित्व योजनेतर्गत उपअधीक्षक कार्यालयामार्फत नागपूर विभागात उल्लेखनीय काम करीत गोंडपिपरी तालुक्याने बहुमान पटकावला.उपअधीक्षक अरुण वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तालुक्यातील कोरंबी ग्रामपंचायतने वर्षानुवर्ष रखडलेल्या जमिनीचा प्रश्न निकाली काढला.एक-दोन नव्हे तर तब्बल ९१ कुटुंबांना आता जागेची कायम मालकी बहाल होणार असून पिढ्यानपिढ्यापासुनच्या त्यांचा प्रश्न भूअभिलेख विभाग आणि कोरंबी ग्रामपंचायतीमार्फत सनद मिळाल्यानंतर सुटला आहे.

गोंडपिपरी या मागासबहुल भागात भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीचे ड्रोन सर्व्हेक्षण पार पडले.केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी उपक्रम असताना याला राज्य सरकारची मदत मिळाली.त्यामुळे दूरवर सर्वच भागात सर्व्हेक्षणाची मोहीम राबविण्यात आली.दरम्यान गावठाण जमावबंदी शिबिरातर्गत हा उपक्रम गोंडपिपरी तालुक्यातील कोरंबी गावात राबविण्यात आला.ज्या गावात बायोगॅसचे प्रकल्प यशस्वी झाले.आजही त्याचा वापर नागरिकांकडून केला जात आहे.घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात कोरंबी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी बजावली.याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत गावाने उद्दिष्ट्य साध्य करून योजनेची महती लोकांना पटवून दिली.गावातील रिकाम्या हातांना रोजगार तर दिलाच परंतू योजनेचा माध्यमातून गावात चकाचक रस्ते निर्माण केले.गावचा शिवार सुजलाम सुफलाम व समृध्द व्हावा यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बारसागडे याचे नेतृत्व आणि ग्रामसेवक देवराव कोडापे यांच्या मार्गदर्शनात उपसरपंच मिना शेंडे,सदस्य सोनी दिवसे,नितेश मेश्राम,श्रावण शेंडे यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.सवर्ग विकास अधिकारी चनफणे,रोहयोचे कार्यक्रम अधिकारी नितेश दुर्योधन यांचे कोरंबी गावच्या प्रगतीकरिता वेळोवेळी सहकार्य लाभत आहे.दरम्यान हजार लोकसंख्येच्या या ग्रामपंचायती अंतर्गत एकूण चाळीसहून अधिक सिंचन विहिरी मंजूर आहेत.यापैकी चौदा विहिरीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

 

या गावाने येणाऱ्या मान्सून सत्रात परिसरात हिरवळ फुलविण्याचा चंग बांधला आहे.त्यासाठी ग्रामसेवक देवराव कोडापे आणि सदस्य नितीन मेश्राम यांचा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे.हे करताना वर्षानुवर्षापासून मालकी हक्कासाठी झुंजणाऱ्या लोकांचा जडील प्रश्न त्यांच्या पुढाकारातून सुटला.ग्रामपंचायती अंतर्गत ४० कुटुंबियांना जमिनीची सनद मिळाली आहे.तसा हा आकडा ९१ असून त्याचे वितरण लवकरच होईल,असे नितीन मेश्राम यांनी सांगितले.गावातील लोकांना अतिक्रमणामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता.राहती जागा बिनकामाची होती.पिढ्यानपिढ्या पासून जागेचा सांभाळ करून देखील त्यावर ना कर्ज मिळाले,नाही जागेचा रेकॉर्ड बनला.अशावेळी बहुप्रतिक्षेनंतर अचानक लोकांना त्यांचा हक्क प्राप्त झाला आहे.

 

दरम्यान जमिनीच्या सनद वाटपाचा कार्यक्रम चेकविठ्ठलवाडा गावात पार पडला.यावेळी भूमापक तुषांत तागडे,दप्तरबंद विनोद चिताडे,सरपंच रमेश बारसागडे,सचिव देवराव कोडापे,सदस्य नितेश मेश्राम,सोनी दिवसे,श्रावण शेंडे,माजी सरपंच भाऊजी चनेकारसह गावकरी उपस्थित होते.

“कोरंबी ग्रामपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.रोहयो अंतर्गत कामात त्यांनी आघाडी घेतली आहे”

नितेश दुर्योधन
कार्यक्रम अधिकारी,रोहयो,गोंडपिपरी