सुरजागड वाहतुकीविरोधात गोंडपिपरीत ‘सर्वपक्षीय’ रास्ता रोको

122

तालुका प्रशासनाला समस्यांचे निवेदन

आपल्या विविध मागण्या घेवून गोंडपिपरीं तालुक्यातील अनेक राजकीय पक्ष,सामाजिक संघटनेसह व्यापारी संघटनेच्या पदाधिका-याकडून सुरजागड वाहतूक विरोधात आज (दि.१४) शहरातील शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी सुमारे तासभर अहेरी-चंद्रपूर व मुल मार्ग बंद होता.दरम्यान आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन गोंडपिपरीचे तहसीलदारांना सादर केले.

सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात विविध मागण्या घेवून दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत गोंडपिंपरी येथील शिवाजी चौकात रास्ता रोखून धरला.सुरजागड प्रकल्पाच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या समस्या त्वरित निकाली काढण्यात याव्या,सुरजागड येथील वाहतूक शहरातून सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत पूर्णता बंद ठेवण्यात यावी,राष्ट्रीय महामार्गावर वाहने उभी न ठेवता कंपनीने स्वतःची व्यवस्था करावी,अपघातात मृत पावलेल्या कुटुंबांना दहा लक्ष तर जखमीला पाच लक्ष रुपये मदत देण्यात यावी,सोबतच कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी द्यावी,अपघातात नुकसान झालेल्या जनतेच्या वाहनाचे व घराची नुकसानभरपाई देण्यात यावी,वाढते अपघात लक्षात घेता केंद्र सरकार व राज्य सरकारने शहरातून वळण रस्त्याला मंजुरी देऊन जड वाहतुकीकरीता बायपास मार्ग काढावा,वाहनाचा वेग हा शहरातून जाताना २० किमी प्रति तासापेक्षा अधिक नसावा,महामार्गाला अडसर ठरत असलेल्या शहरातील अतिक्रमण हटवण्यात यावे,शहरातील सर्विस रोड व ओपन स्पेस मोकळे करावे,सुरक्षारक्षक भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे इत्यादी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या होत्या.दरम्यान यातील बऱ्याच मागण्यांवर तोडगा काढण्यात आला.काही समस्यांवर कंपनी व्यवस्थापनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले.या आंदोलनात संदीप करपे,बबन निकोडे,राजू झाडे,सुरज माडुरवार,नितीन धानोरकर,शैलेशसिंह बैस,सुनील संकुलवार,सारिका मडावी,तुकाराम सातपुते,पंकजसिंह डांगी,मनीषा मडावी यासह मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.दरम्यान यावेळी उपस्थित गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बाहाकर यांना आंदोलकर्त्यांनी समस्यांचे निवेदन सादर केले.आंदोलनासाठी ठाणेदार रमेश हत्तीगोटे,जीवन राजगुरू यांच्या नेतृत्वात स्थानिक पोलीस व दंगा नियंत्रण पथकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.