* दिवंगत प्रशांत उर्फ नाना येल्लेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
* नागरिकांना होणार आता ‘प्रॉपर्टी कार्ड’चे वाटप
बाळू निमगडे/आक्सापूर-
गोंडपिपरीच्या विकासाची धुरा नगर खात्याच्या खाद्यावर आली.अल्पावधीतच शहराचा तुलनात्मक विकास झाला आणि शहर देखील विस्तारले.परंतू येथील गावठाणाचा विषय मात्र अजूनही सुटला नाही.त्यामुळे जनतेला घर बांधकामासह इतरही कामासाठी मर्यादा आहेत.त्यामुळे शहरातील सुमारे ५२ वर्षापासून प्रलंबित असलेला गावठाणाचा विषय सर्वप्रथम भाजपाचे दिवंगत तालुका महामंत्री प्रशांत येल्लेवार यांनी उचलून धरला.प्रकरण अंतिम टप्प्यावर असताना येल्लेवार याचा दुर्दैवी मृत्यू झाला.यादरम्यान माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी हा मुद्दा हाताळला.प्रशांत येल्लेवार यांनी अनेक वर्ष केलेला संघर्ष फळास येवून रखडलेल्या प्रकरणाला न्याय मिळाला.त्यामुळे येल्लेवार यांनी त्यांच्या हयातीत केलेल्या प्रयत्नाची संकल्पपुर्ती त्याच्या मृत्युनंतर झाली.
- गोंडपिपरी शहराची प्राचीन वस्ती म्हणून ओळख आहे.दरम्यान शहरात मोठा बदल झाला.गावाची लोकसंख्या वाढली.शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना आपल्या हक्काचा निवारा शोधण्यासाठी येथील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.शहराच्या आसपासचा परिसर गावठाण जागेनी व्यापला आहे.मध्यभागी गोंडपिपरी गाव वसल्यामुळे नाहीलाजास्तव शहरातील बऱ्याच लोकांनी गावठाण जागेवरच अतिक्रमण केल्याचा प्रकार दिसून येत आहे.सदर जागेवर मागील अनेक वर्षापासून त्यांनी अतिक्रमण करून घरे बांधली.परंतू अजूनपर्यंत प्रशासनाने नागरिकांच्या या बांधकामाला नियमित केले नाही.हा प्रकार मागील ५२ वर्षापासून प्रलंबितच आहे.शहरातील राममंदिर वार्डात देखील तेथील नागरिकांचा हा प्रश्न आहे.सदर प्रश्नाची उकल करण्यासाठी गोंडपिपरी तालुका भाजपचे महामंत्री प्रशांत येल्लेवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नगर भूमापन करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. येल्लेवार याच्या पत्रानुसार चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनामार्फत नगर भूमापनाची कार्यवाही केली.नगर भूमापनानंतर जागेचा घोळ संपला.मात्र ‘म्हाडा’कडून त्यांचा वाटा शासनजमा करण्यास दिरंगाई झाली.अशावेळी घरकुल लाभार्थ्यांच्या नावे ‘म्हाडा’ रक्कम उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत मोजणी देखील पूर्ण होणार नव्हती.याचाअर्थ भूमी अभिलेख कार्यालयाकडून सुध्दा जागेच्या मोजणीची प्रत प्रशासनाकडे सादर करण्यात आली नाही.त्यामुळे शहरातील राममंदिर परिसरात घरकुल किंवा सरकारी योजनेतून निवारा उभारणे दिवास्वप्नच राहिले.या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व स्थानिकांना घरकुल योजनेचा लाभ घेता यावा म्हणून ‘म्हाडा’ने त्यांच्यामार्फत शासनाकडे भरणा करावयाची रक्कम भूमिअभिलेख कार्यालयात तात्काळ जमा करण्याची मागणी प्रशांत येल्लेवार यांनी केली.सदर मागणीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यासंदर्भात त्यांनी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विनंती केली.याचदरम्यान येल्लेवार यांचा मृत्यू झाला.मात्र त्यांच्या मृत्यूपश्चात शहरवासियांची बाजू माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी लावून धरली.आता त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार नुकतेच शहराच्या गावठाण क्षेत्राचे सर्व्हेक्षण पार पडले.दरम्यान ४ जुननंतर येथील लोकांना हक्काच्या निवाऱ्यासाठी ‘प्रॉपर्टी कार्ड’चे वाटप होणार असून त्यामुळे जागेच्या मालकी हक्काचा प्रश्न मिटणार आहे.








