डॉ.रुपाली बोम्मावार “नवभारत पावरफुल वूमन ” पुरस्काराने सन्मानित

384

 

समाजसेवेच्या बळावर ऊंच भरारी

 

सावली ता.प्र.

 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व साथ फाउंडेशनच्या सचिव डॉ. रुपाली रोहित बोम्मावार यांना “नवभारत पावरफुल वूमन अवार्ड २०२६” प्रदान करून नुकतेच सन्मानित करण्यात आले.

 

 

१४ मार्च २०२६ रोजी नागपूर येथील रामदास पेठ परिसरातील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांच्या हस्ते डॉ. रुपाली बोम्मावार यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला. समाजकार्यातील त्यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी योगदानाची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

डॉ. रुपाली बोम्मावार या सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्य करत असून महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य जनजागृती, तसेच समाजातील वंचित व गरजू घटकांना मदत करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्या “साथ फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य शिबिरे, सामाजिक जनजागृती उपक्रम अशा विविध क्षेत्रात सातत्याने कार्य केले आहे.

 

विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत सामाजिक मदत पोहोचविण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणे आणि समाजातील वंचित घटकांसाठी मदतीचा हात देणे या उद्देशाने त्या सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्या आहेत.

 

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव सुधा करण्यात आला. या वेळी सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. रुपाली बोम्मावार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

पुरस्कार स्वीकारताना डॉ. रुपाली बोम्मावार यांनी सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देणारा आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि गरजू घटकांच्या सेवेसाठी माझे कार्य यापुढेही कायम सुरु राहील.”

डॉ. रुपाली बोम्मावार यांच्या या सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवी ओळख मिळाली असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले कार्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात येत आहे ….