महसूल विभागातील पारदर्शकतेसाठी महसूलमंत्री बावनकुळेंची ऑपरेशन क्लीन मोहीम

379

अधिकारी कर्मचाऱ्यावर राहणार सात विशेष पथकांची नजरतक्रारीची पंधरा दिवसात होणार चौकशी

मुंबई : महसूल विभागातील
कामकाज अधिक पारदर्शक आणि जबाबदार करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे पाऊल उचलत ऑपरेशन क्लीन राबवण्यास सुरुवात केली आहे. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात येणाऱ्या वा तक्रारींची जलद व निष्पक्ष चौकशी करण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्त स्तरावर सात विशेष दक्षता पथके स्थापन करण्याचा निर्णय बावनकुळे यांनी घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. तसेच या पथकांच्या कार्याचा नियमित आढावा घेण्यासाठी महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय राज्यस्तरीय उच्चस्तरीय समितीही तयार करण्यात आली आहे.

 

जमीन मोजणी, गौण खनिज, मुद्रांक शुल्क आणि इतर महसूल संबंधित कामकाजात आढळणाऱ्या अनियमितता तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधातयेणाऱ्या गंभीर तक्रारींची तपासणी सुव्यवस्थित करण्यासाठी ही पथके पुढील १५ दिवसांत स्थापन करणे विभागीय आयुक्तांना बंधनकारक करण्यात आले आहे. पथकाच्या अध्यक्षस्थानी अपर आयुक्त (महसूल) असतील, तर उपजिल्हाधिकारी (महसूल) सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, सह जिल्हा निबंधक आणि तहसीलदार दर्जाचे अधिकारी या पथकात सदस्य म्हणून असतील. तपासणीच्या वेळी पथकातील किमान चार अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शासनाकडून आलेल्या तक्रारींवर दक्षता पथकाला ३० दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करावा लागेल, तर गंभीर तक्रारींवर १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पथकाने मागितलेली कागदपत्रे लपवल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावरच कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास दोषींवर ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९’ नुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच गरज पडल्यास ही पथके आपल्या विभागाबाहेरही तपासणी करू शकतील. या ‘दक्षता पथकांमुळे महसूल विभागातील तक्रार निवारण प्रक्रिया अधिक गतिमान आणि प्रभावी होईल,’ असे बावनकुळे यांनी सांगितले.
(साभार दै. पुण्यनगरी)