
सावली तालुक्यात तापले राजकीय वातावरण : भाजपच्या विजयाचा नवा फॉर्म्युला?
कांग्रेसला बसणार मोठा धक्का
चंद्रपूर : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच चंद्रपूरच्या राजकीय पटावर नवा रंग भरू लागला आहे. विशेषतः सावली तालुक्यात युवकांमध्ये लोकप्रिय असलेले युवा नेतृत्व, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व साथ फाऊंडेशनचे संस्थापक रोहित बोम्मावार लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान बोम्मावार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे वरिष्ठ नेते यांच्याशी संपर्कात असून येत्या काही दिवसांत सावली येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार असून भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत औपचारिक पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांच्या प्रवेशामुळे सावली तालुक्यात भाजपला युवकांमध्ये मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

समाजकारणातून राजकारणाकडे वाटचाल
गेल्या काही वर्षांपासून बोम्मावार यांनी सहकार, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात ठसा उमटवला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता त्यांनी “साथ फाऊंडेशन”च्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम सातत्याने राबवले. त्यामुळे त्यांची एक विश्वासार्ह, सकारात्मक आणि समर्पित कार्यकर्त्याची प्रतिमा समाजात निर्माण झाली आहे.भाजपशी जवळीक, आता अधिकृत प्रवेशाच्या उंबरठ्यावर सीडीसीसी बँकेत निवडून आल्यानंतर बोम्मावार यांची आमदार बंटी भांगडीया व माजी आमदार अतुल देशकर यांच्याशी जवळीक वाढली. त्यांच्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये बोम्मावार यांची उपस्थिती तर बोम्मावार यांनी सावली येथे आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यादाच झालेल्या सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवात भांगडीया यांची प्रामुख्याने उपस्थिती दिसून आली. त्यानंतर छोट्या-मोठ्या कार्यक्रमातही त्यांची उपस्थिती दिसली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. आता आरक्षण जाहीर होताच बोथली-कवठी जि. प. क्षेत्रात अनुकूल आरक्षण मिळाल्याने, त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. तालुक्यात ‘रोहित भाऊ आमचा नेता, लई पावरफुल!’ या घोषणांनी सोशल मीडियापासून मैदानात प्रचारतोफा सुरू झाल्या आहेत.
जिल्हा बँकेतील एकतर्फी विजयाने राज्यात लक्ष वेधलं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक मातब्बर दिग्गज रिंगणात असतानाही रोहित बोम्मावार यांनी सहकारी पतसंस्था गटातून तगडी उमेदवारी दिली. त्यांच्या अर्जावर काही बड्या नेत्यांनी विरोध दर्शवला होता, मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता केवळ आपल्या जनसंपर्क आणि सुक्ष्म नियोजनाच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवला. एकट्याने ७० टक्के मतदानाने विजय मिळवत त्यांनी सर्वसामान्यांसह राजकीय नेते, विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या दणदणीत विजयामुळे जिल्हा स्तरावरील राजकारणात त्यांच्या नावाची नोंद एक प्रभावी नेतृत्व म्हणून झाली.
राजकीय पटलावर ‘युवा चेहरा’
रोहित बोम्मावार यांचा भाजपमध्ये प्रवेश हा केवळ एक नेता भाजपमध्ये प्रवेश करत आहे इतकाच मर्यादित नसून, सावली तालुक्यातील युवा नेतृत्वाचा राजकारणात शिरकाव अशा अर्थानेही पाहिले जात आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे भाजपला ग्रामस्तरावर नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.









