
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्याची घोषणा

सरसकट हेक्टरी 10 हजाराची मदत देण्याची आ. मुनगंटीवार यांची मागणी
चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी त्याची तात्काळ दखल घेतली. धान उत्पादक शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी मदत देण्यासाठी अस्तित्वात असलेले विविध शासन निर्णय सभागृहासमोर ठेवत सोयाबीन उत्पादकांना येलो मौझेकने झालेल्या नुकसानाची भरपाई देताना जी पद्धत अवलंबिली तीच पद्धत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी वापरत नुकसान भरपाई देण्याची मागणी आ.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी रेटली.दरम्यान पीक कापणी झाल्यामुळे पंचनामे होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती असल्याचे सांगत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी एक रुपये पीक विमा योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना देता येईल असे सांगितले. मात्र, या प्रकरणी पीक विमा लागू होत नसल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यात पीक विमा योजनेचे 73 कोटी रुपये अद्याप अप्राप्त असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
हे अधिवेशन सुरू असेपर्यंत सर्व संसदीय आयुधांचा वापर करून आपण पाठपुरावा करू. मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.